ABOUT
चरित्रामृत
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत्तम (श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र, भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार):
कलियुगा मधील भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र ग्रंथ, त्यांचे भक्त शंकर भट, भारतातील कर्नाटक राज्यातील एक धार्मिक ब्राह्मण यांनी सुमारे इसवी सन १३५० मध्ये लिहलेले आहे. इसवी सन १३३६ मध्ये एकदा ते उडुपीला तीर्थयात्रेला गेले असता श्रीकृष्णाने त्यांना आपले सुंदर दर्शन दिले आणि शंकर भटांना कन्याकुमारी येथे देवी कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्यास सांगितले. तेथे देवीनेही त्यांना तिचे पवित्र दिले आणि कुरवपूरला जाण्याचे आणि श्रीपाद श्रीवल्लभांना भेटून जीवन कृतार्थ करण्याचे निर्देश दिले. देवी अंबेच्या सूचनेनुसार शंकर भटांनी कुरवपूरच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला, वाटेतल्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली; कधीकधी अचानक त्यांना बैलगाडीत प्रवास करायला मिळे आणि विविध जातीच्या लोकांच्या घरी पाहुणचार आणि राहण्याची सोय आपोआप होत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सर्व श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त असायचे आणि श्रीपादांच्या अनेक लीलांचे अनुभव कथन करायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घटना श्रीपादांच्या जन्मापासून ते त्यांचे जन्मस्थान पिठापूर सोडल्यापर्यंतच्या कालक्रमानुसार होत्या. शंकर भट स्वत: त्यांच्या या संपूर्ण प्रवासात जणू काही प्रत्यक्ष श्रीपादांच्या ह्या लीला अदृश्य स्वरूपात बघत असल्याचे अनुभवत होते. दोन वर्षांच्या प्रवासनंतर कुरवपूरला पोहोचून आणि पुढे श्रीपादांच्या वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत त्यांच्या सहवासात राहून शंकर भटांनी श्रीपादांनी केलेले आणखी अनेक चमत्कार अनुभवले. गुरुद्वादशी ऑक्टोबर १३५० मध्ये, श्रीपाद, वयाच्या 30 व्या वर्षी कुरवपूर येथे कृष्णा नदीत अंतर्धान पावले आणि त्यांचे शारीरिक रूप लपवले. कृष्णानदीत गुप्त होण्यापूर्वी श्रीपादांनी शंकर भटांना कुरवपूरमध्ये तीन वर्षे राहून संस्कृतमध्ये “श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतम्” या ग्रंथ पूर्ण करण्याची सूचना दिली. शंकर भट यांनी नंतर ही मूळ संस्कृत हस्तलिखिते श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मामाकडे सुपूर्द केली. अखेरीस ते तेलुगुमध्ये अनुवादित केले गेले आणि त्यानंतर भूर्जपत्रांवर लिहिलेले संस्कृत हस्तलिखित अदृश्य झाले. गंधर्वांनी तो मूळ संस्कृत ग्रंथ सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीत खोलवर नेऊन ठेवले जेथे अनेक सिद्ध पुरुष सतत त्याचे श्रद्धापूर्वक वाचन करत आहेत. श्रीपादांच्या सूचनेनुसार मूळ तेलगू प्रत श्रीपादांच्या मामांच्या ३३ व्या पिढीपर्यंत लोकांपासून गुप्त ठेवली गेली. २००१ च्या सुमारास, दैवी संकेतानुसार, श्रीपादांच्या मामाच्या वंशजांनी चरितामृतमाची एक प्रत पिठापूर येथील महासंस्थानला दिली.
त्याची एक छापील आवृत्ती प.पू.श्री.हरिभाऊ निटूरकर जोशी (भाऊ महाराज), हैदराबाद यांना भेट देण्यात आली आणि तिचे मराठीत भाषांतर करण्याची विनंती करण्यात आली. अनुवादाच्या वेळी श्रीपाद स्वतः प.पू.भाऊ महाराजांना दर्शन देत असत व सुधारणा करावयाच्या सूचना देत असत. भाऊ महाराजांनी केलेल्या या अनमोल कार्यामुळे ९०००००हून अधिक भक्तांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या लिलांच्या वाचनाचा अवर्णनीय आनंद घेता आला आहे आणि श्रीपादांच्या अमृतमय कृपेत न्हाऊन निघाले आहेत. अनेक भक्तांनी हे चरित्रामृत वाचून अतर्क्य चमत्कार अनुभवलेले आहेत. काही वेळा या चरितामृताच्या केवळ उपस्थितीने भक्तांना त्रासदायक परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केली आहे. सध्याच्या वेगवान जीवन परिस्थितीचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन मराठी, इंग्रजी, हिंदी यांसारख्या भाषांमध्ये संक्षिप्त चरित्रामृत देखील श्रीपादांच्या आज्ञेनुसार केले गेले. त्यांचे वाचन, पारायण देखील मूळ ग्रंथसारखेच फलदायी आहे.अनेक रहस्ये उलगडत असल्याने आध्यात्मिक साधकासाठी हे चरित्रामृत वरदान ठरत आहे. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे म्हणजे त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे! या चरितामृतमातील मजकूर वाचकांना मंत्रमुग्ध करतो, काही ठिकाणी चकित करतो. त्यात समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, सदाशिव ब्रह्मेंद्र स्वामी यांचा जन्म… अशी विविध भविष्यवाणी करण्यात आली आहे. श्रीपादांच्या भावी अवतारांचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी, श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा यांचेही वर्णन केले आहे.
आपले लाडके सद्गुरू प.पू. भाऊ महाराज म्हणतात त्याप्रमाणे पारायण करताना “आपण कशाचाही अभ्यास करू नये तर या ग्रंथाच्या भक्तिपूर्ण वाचनावर लक्ष केंद्रित करावे” , त्यात वर्णन केलेल्या घटना आणि मजकूर आपल्या आकलनाच्या पलीकडे असल्याने आपली गृहीतके आणि तर्क बाजूला ठेवणे चांगले.
सर्व भक्तांना ह्या दिव्य ग्रंथाच्या वाचनाचा लाभ होवो.